जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी तर जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाने 15 जणांचे बळी गेले. आतापर्यंत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनामुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्याही सातत्याने वाढतच असून, ती चारशेच्या पुढे गेली आहे.
मंगळवारी जळगाव जिल्ह्यात नव्याने 183 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एकूण 8 हजार 187 वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जळगाव शहर 39, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 6, अमळनेर 4, चोपडा 25, पाचोरा 20, धरणगाव 13, यावल 4, एरंडोल 3, जामनेर 12, रावेर 12, पारोळा 13, चाळीसगाव 5, मुक्ताईनगर 10, बोदवड 5 असे एकूण 183 नवे बाधित रुग्ण आढळले.
हेही वाचा - राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..
मंगळवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यात 15 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 4, धरणगाव, चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी 2, जळगाव तालुका, जामनेर, पाचोरा, यावल, रावेर, चोपडा व अमळनेर या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 251 जण कोरोनामुक्त झाले आहेत.