जळगाव- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काल एकाच दिवशी कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 13 पुरुष तर 2 महिला रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 564 जणांचा बळी गेला आहे. काल दिवसभरात 345 नव्या रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा आकडा 12 हजार 381 इतका झाला आहे.
जिल्हा प्रशासनाला काल रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 345 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सर्वाधिक 77 रुग्ण हे भडगाव शहरासह तालुक्यात आढळले आहेत. त्या खालोखाल 44 पॉझिटिव्ह रुग्ण हे पाचोरा शहरात आढळले. त्याचप्रमाणे, जळगाव शहर 40, जळगाव ग्रामीण 11, भूसावळ 9, अमळनेर 31, चोपडा 22, धरणगाव 17, यावल 3, जामनेर 29, रावेर 7, पारोळा 15, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर प्रत्येकी 14, तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील 1, असे एकूण 345 नवे रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 8 हजार 693 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी 224 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असताना दुसरीकडे, कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील थांबत नसल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरशः हतबल झाल्याचे दिसून येत आहे. काल झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक 5 मृत्यू हे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात झाले आहेत. त्याचप्रमाणे, रावेर तालुक्यातील 2, चोपडा, भूसावळ, भडगाव, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर आणि जळगाव तालुक्यातील प्रत्येकी एक, असे एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- राममंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद घरातच साजरा करा; पोलीस प्रशासनाचे आवाहन