जळगाव - लग्न समारंभावरून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या क्रूजर गाडीला डंपरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दहा जण जागीच ठार झाले असून अन्य सात जण गंभीर आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल गावातील चौधरी कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. चौधरी कुटुंबीय मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन आटोपून घरी परतत असताना वाटेतच हा अपघात घडला असून यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संबंधित जखमींना यावल, भुसावळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री चोपडा येथून लग्नसमारंभ आटोपून हे कुटुंबीय क्रुझर गाडीने मुक्ताईनगरकडे परतत होते. मुक्ताईनगर जिल्ह्यातील चिंचोल येथील चौधरी कुटुंबातील मुलीचा लग्न सोहळा नुकताच पार पडला होता. या सोहळ्यानंतर रविवारी सायंकाळी चोपडा येथे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी चौधरी कुटुंबीय तसेच इतर नातेवाईक उपस्थित होते. रिसेप्शन आटोपल्यानंतर चौधरी कुटुंबीय 3 क्रूझर गाड्यांनी चिंचोलीकडे परतत होते.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ या 3 गाड्यांपैकी (एम. एच. 19 सी. व्ही. 1772) क्रमांकाच्या क्रूझरला समोरून भरधाव येणाऱ्या डंपरने जोरात धडक दिली. त्यात क्रूजरमधील 10 जण ठार झाले, तर 7 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ज्या क्रूझरला डंपरने धडक दिली. त्यामध्ये महिला आणि लहान मुले होती. अपघाताची माहिती मिळताच यावल तसेच रावेर येथून काहींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते.
मात्र, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने भुसावळ तसेच जळगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृतांपैकी 6 जणांवर यावल ग्रामीण रुग्णालयात तर उर्वरित 4 जणांवर जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होणार आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल, चांगदेव आणि रावेर तालुक्यातील निंबोल या 3 गावांमधील लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनंतर तीनही गावांवर एकच शोककळा पसरली आहे. या अपघातात चिंचोल येथील प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी यांच्यासह त्यांच्या पत्नी तसेच दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे.
अपघातातील मृतांची नावे
1) मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
2) प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय 60, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
3) आश्लेषा उमेश चौधरी (वय 28, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
4) रिया जितेंद्र चौधरी (वय 14, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
5) प्रभाबाई प्रभाकर उर्फ बाळू चौधरी (वय 40, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
6) सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
7) प्रियंका नितीन चौधरी (वय 28, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
8) सोनाली सचिन महाजन (वय 34, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर)
9) सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55, रा. निंबोल, ता. रावेर)
10) संगीता मुकेश पाटील (वय 40, रा. निंबोल, ता. रावेर)
अपघातातील जखमींची नावे
1) सर्वेश नितीन चौधरी (वय 9, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
2) धनराज गंभीर कोळी (वय 35, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
3) आदिती मुकेश पाटील (वय 14, रा. निंबोल, ता. रावेर)
4) शिवम प्रभाकर चौधरी (वय 15, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
5) सुनीता राजाराम पाटील (वय 45, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
6) मीना प्रफुल्ल चौधरी (वय 30, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर)
7) मुकुंदा गणेश भंगाळे (वय 25, रा. डांभुर्णी, ता. यावल)