जळगाव - मुक्ताईनगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. भाऊबंदकीच्या वादात पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्यात गैरहजर राहणाऱ्या एका तरुणाविरुद्ध न्यायालयाने समन्स काढले होते. या तरुणास मुक्ताईनगर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती न देता अटक करून भुसावळ कारागृहात ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे, कारागृहात त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करून तेथेच सोडून दिले. हा प्रकार समोर आल्यानंतर तरुणाच्या पत्नीने आपल्या पतीला पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याचा आरोप केला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील सुनील भागदेव तारू (वय ३५) याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. २ वर्षांपूर्वी त्याचे काका कडू जगन्नाथ तारू यांना मारहाण केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या खटल्यात तो गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याला समन्स बजावले होते. या समन्स आधाराने मुक्ताईनगर पोलिसांनी त्याला शनिवारी (२९ फेब्रुवारी) चांगदेव येथील शेतातून अटक करीत भुसावळ कारागृहात नेले. त्याला ४ मार्चला जामीन द्यायचा होता. पोलिसांनी सुनील यास अटक केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली नव्हती. त्यामुळे पती अचानक बेपत्ता झाल्याने ४ दिवसांपासून त्याची पत्नी त्याचा शोध घेत होती. दुसरीकडे, मद्याचे व्यसन असलेल्या सुनीलची प्रकृती कारागृहात खालावल्याने त्याला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
हेही वाचा - सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण नाही, अश्विनी रुग्णालयाचा खुलासा
सुनीलच्या पत्नीला पती जिल्हा रुग्णालयात गंभीर परिस्थितीत असल्याचे कळल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कुठलीही माहिती न देता पतीला अटक केल्याबद्दल ती संताप व्यक्त करीत होती. अटकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, सुनीलचे काका कडू तारू यांनी या खटल्यातून माघार घेतल्याने सुनीलला न्यायालयाने निर्दोष केले होते. पोलिसांनी त्याची माहिती सुनील यास न देता केवळ रुग्णालय प्रशासनाकडे त्याचे निर्दोष झाल्याचे पेपर दिले. त्यानंतर पोलीस निघून गेल्याने सुनीलच्या पत्नीच्या संतापात भर पडली. पतीला अशा अवस्थेत पोलिसांनी बेवारस सोडल्याचा आरोप करीत त्यांनी संताप व्यक्त केल्याने खळबळ उडाली होती.