हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील जोड पिंपरी येथे अनैतिक संबंधातून एकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या महिलेने हा खून केला असल्याची शक्यता आहे, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, महिलेच्या घरात मोठा खड्डा आढळल्याने, मृतदेह घरातच पुरण्याचा या महिलेचा प्लॅन होता. मात्र, आपण पकडले जाऊ या भीतीपोटी तो मृतदेह सिद्धेश्वर तलाव परिसरातील दगडांमध्ये विवस्त्र अवस्थेत टाकला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, परिसरात दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली.
भागोराव प्रल्हाद पोले (45 रा. जोड पिंपरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते 20 जुलैपासून घरातून बेपत्ता होते. घरच्यांनी बाबुराव यांचा बराच शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. शेवटी पोले कुटुंबीयांनी सिद्धेश्वर धरण परिसरात पाहण्यास सुरुवात केली. परिसरात दुर्गंधी येत असल्याने त्या भागात अधिक पाहणी केली. तर दगडांमध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये भाऊराव फुले यांचा मृतदेह दिसून आला. सदर घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार सचिन जोशी, जमादार घुगे गिरी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दगडांमध्ये असलेला मृतदेह बाहेर काढला.
हेही वाचा - वृद्धाला खाटेवरुन नेले रुग्णालयात; पाणी भरलेल्या रानातून काढली वाट..
मृतदेहाच्या अंगावर काहीही कपडे नव्हते आणि मृतदेह भागोराव पोले यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तर मृतदेहाच्या अंगावर आणि चेहऱ्यावर खूना असल्याने हा खूनच असल्याचेच स्पष्ट होत होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे औंढा पोलिसांनी सदर एका संशयीत महिलेला ताब्यात घेतले. तर या महिलेच्या घरातही मोठा खड्डा करण्यात आला होता, असे आढळले. याच ठिकाणी मृतदेह दाबून टाकण्याचा तीचा प्लॅन असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, आपण पकडले जाऊ या भीतीपोटी तिने सदर मृतदेह सिद्धेश्वर धरणाच्या काठावर असलेल्या दगडामध्ये फेकून दिला असावा, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकरणांमध्ये अजूनही काही जणांचा सहभाग असावा असेही पोलिसांना वाटत असून त्यांचा त्यादृष्टीने तपास सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.