हिंगोली- मुंबई ते औंढा नागनाथ पर्यंत कोरोनाबाधित रुग्णासोबत प्रवास केलेल्या एका 42 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी या गावातील एका गरोदर महिलेला देखील कोरोना लागण झाली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत चाललेली आहे. आता गरोदर मातांना देखील कोरोना होत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई येथून कोरोनाबाधित रुग्णांसोबत आलेल्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असता, त्यापैकी एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. प्रशासनाने सतर्कता दाखवत हे वाहन औंढा नागनाथ तालुक्यात दाखल होताच , त्या वाहनातील सर्वांना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवले होते. त्यातीलच एका 42 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे सोबत आलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी या गावातील एका गरोदर महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबातील व गावातील काही जणांचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठवले असता, त्यातील 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कळमनुरी तालुक्यातील घोळवा या गावातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा हैदराबाद येथे मृत्यू झाल्याने त्याच्या संपर्कातील 32 व्यक्तीचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असता, त्यापैकी 31 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. अन 1 अहवाल रिजेक्ट झाल्याने परत तपासणी करण्यासाठी अहवाल पाठवण्यात येणार आहे.
कळमनुरी येथील काजी मोहला भागातील 8 व 2 वर्षीय बालकांवर कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. त्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने त्याना सुट्टी देण्यात आली आहे. एकंदरीतच आजघडीला जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये 678 व्यक्ती दाखल असून 367 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे.