हिंगोली - सासू-सासऱ्यांनी विधवेला मुलासह घराबाहेर हाकलल्याची घटना संतुक पिंपरी येथे घडली. या पार्श्वभूमिवर पीडितेने मुलासह ४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून अद्याप प्रशासनाने या उपोषणकर्त्या कुटुंबाची दखल घेतलेली नाही.
उज्वला अश्रूबा दिपके (रा. संतुक पिंपरी), असे या विधवा महिलेचे नाव आहे. उज्वलाबाई यांच्या पतीचे 2016 मध्ये निधन झाले. दोन वर्ष विधवा पत्नीने घर आणि शेतीचा सांभाळ केला. मात्र, सासू सासऱ्याने अचानक या माय-लेकराला घराबाहेर हाकलले. त्यामुळे वर्षभरापासून ही माय लेकरे हक्काचे घर आणि शेतीसाठी सासू सासऱ्यांच्या धरी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, महिला लेकरा बाळासह संतुक पिंपरी येथे गेली तेव्हा सासरा तिला मारण्यासाठी धाऊन येत असल्याचे महिला डोळ्यात अश्रू आणत सांगत आहे.
एवढेच नव्हे तर भांडण सोडवण्यासाठी नातवंडांनी मध्यस्ती केल्यानंतर त्यांना देखील मारहाण केली जाते. हा प्रकार जवळपास वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे महिला आपल्या माहेरी आईकडे राहत आहे. सदरील महिला सासरी गेली की तिला मारण्यासाठी सासरा तयार राहत आहे. माझ्या पतीच्या नावाने असलेल्या वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी पत्र करून देण्याच्या मागणीसाठी महिलेने आपला मुलगा आणि आईसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे प्रशासनाने अजून तरी लक्ष दिलेले नाही. मला प्रशासनाकडून न्याय मिळेल ही अपेक्षा असल्याचे महिला सांगत आहे. एवढे करूनही जर प्रशासन दखल घेत नसेल तर मी न्याय मिळण्यासाठी आत्मदहन करणार असल्याचे महिलेने सांगितले आहे.
नामदेव राघोजी दिपके (सासरा), पंचशीला नामदेव दिपके (सासू), सुखदेव नामदेव दिपके (दीर), महावीर नामदेव दिपके, कल्पना महावीर दिपके या सर्वांनी आम्हा माय लेकरावर अन्याय केल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलेने केला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे केली आहे.