हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने मोठी खबरदारी पाळली जात आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील बोरगाव येथे दोन सख्या बहिणींचे एकाच मंडपात लग्न लावून देण्याचा प्रताप उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर, या मंडपात पाचशेच्या वर वऱ्हाडी मंडळी दोघींनाही आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. याची खबर लागताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांचा ताफा घेऊन विवाहस्थळी धाव घेतली. त्यामुळे सर्वांचीच चांगलीच पळापळ निर्माण झाली होती. याप्रकरणी चौकशी करून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने प्रशासन अति बारकाईने लक्ष ठेवून आहे. एवढेच नव्हे तर हिंगोली शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून औंढा वसमत येथेदेखील संचारबंदी आहे. मात्र, अशा परिस्थितीतही, विवाह समारंभात पन्नास व्यक्तींना प्रशासनाच्यावतीने मुभा देण्यात आली आहे. परंतु, बोरगाव येथील एका वधूपित्याने तर हद्दच ओलांडली, दोन्ही बहिणींच्या विवाहाचे एकाच मंडपामध्ये आयोजन केले. वधू आणि वर दोन्हीकडील मंडळी पाचशेच्या वर आल्यामुळे ही बाब प्रशासनाला कळतात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विवाहस्थळी धाव घेतली. या प्रकाराने सर्वांचीच तारांबळ उडाली होती.
प्रशासकिय गाड्या विवाहस्थळी दाखल होताच वर्हाडी मंडळीत चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. एवढे वारंवार सांगून देखील या आयोजकांनी नियमाची ऐसीतैसी केली. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु, तक्रार आल्यास आम्ही संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे बासंबा पोलीस ठाण्याचे सपोनि राजेश मल्ल पिलू यांनी सांगितले. तर, ग्रामस्तरीय समितीच्या आधारे चौकशी करून पाचशेच्या वर मंडळी आढळल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितले.