हिंगोली - जिल्ह्यात सलग चार ते पाच वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत इसापू धरणावरून कळमनुरी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे.
इसापूर धरणात सध्य स्थितीत केवळ 0. 53 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 15 टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. जिल्ह्यातील 90 च्या वर गावांची तहान ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे आजही 48 टँकरने पाणी पुरवठा केला जातो. बऱ्याच गावांत पाण्यासाठी आजही भटकंती सुरू आहे. जुलै महिना संपत असतानाही ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. आशा परिस्थितीत कळमनुरी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. पाईप लाईन नेमकी कशाने फुटली हे अद्याप समजू शकलेले नाही. ही पाईप लाईन रस्त्याच्या कडेला असल्याने, रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.