हिंगोली - जिल्ह्यातील वसमत पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये सर्वसामान्यांचे काम घेऊन गेलेल्या शिक्षण सभापती यांनी गटविकास अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करत रात्र काढली. इतकेच नाहीतर याच ठिकाणी जेवण देखील केल्याचे व्हिडिओ व्हायरल केले. आता चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्याला पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप अधिकाऱ्याने केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच पैसे मिळणार नाही, तोपर्यंत खुर्ची सोडणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितल्याने कार्यालयात गेलो नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. मात्र, नंतर त्यांनी असं काहीही घडले नाही, असं सांगून घुमजाव केला आहे.
शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल सुरुसे यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी 4 वाजता गेल्या. यावेळी त्यांनी सुरुसे यांच्या खुर्चीचा ताबा घेतला. त्यानंतर सुरुसे यांना मोबाईलवरून संपर्क केला असता, ते पाच मिनिटात येतो म्हणाले. मात्र, ते आले नाही. त्यामुळे चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह त्याचठिकाणी जेवण केले. याचे व्हिडिओ देखील व्हायरल केले होते. मात्र, चक्क पाच लाख रुपयांसाठी शिक्षण सभापती चव्हाण अधिकारी सुरुसे यांच्या दालनात मुक्काम ठोकला होता, असा आरोप अधिकाऱ्याने केला. त्यानंतर हा प्रकार जिल्हा परिषदेच्या सचिवांना सांगितला. त्यानंतर सीईओ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना बोलावले.
साडेबारा वाजेपासून सभापती चव्हाण यांच्याच कॅबिनला सुरुसे यांना बोलावून चर्चा सुरू होती, तर रात्री ११ वाजता गटविकास अधिकारी यांच्या दालनात केलेले जेवण देखील घरूनच बोलावले असल्याचे सभापती चव्हाण यांनी सांगितले. एकंदरीत उशीरा चर्चा सुरू असल्याने अजून तरी या प्रकरणात काहीही ताळमेळ लागलेला नाही. मात्र, यातील नेमकी सत्यता काय आहे? हे सीईओ यांच्या निकालातून पुढे येणार आहे. शिक्षण सभापती या एका कंत्राटदाराचे काम घेऊन गेल्या होत्या. तसेच ही कंत्राटदार व्यक्ती सर्वसामान्य आहे. त्यामुळे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
गटविकास अधिकारी सुरुसे यांचा घुमजाव -
गटविकास अधिकारी सुरुसे आणि सभापती यांच्यामध्ये जवळपास पाऊस तास चर्चा झाली. मात्र, यामध्ये काय घडलं? याबाबत विचारले असता, असे काहीच घडले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाची जिल्हा परिषद परिसराच चर्चा रंगली होती.