हिंगोली - जिल्ह्यात अपघातांच्या घटना वाढत आहेत. आज(सोमवार) वारंगा फाटा ते हदगाव मार्गावरील चुंचा फाटा येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. तुकाराम राघोजी काळे (55), रावसाहेब गणपतराव लोमटे (रा. चुंचा, ता. कळमनुरी) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेजण चुंचा येथून वारंगाफाटा मार्गे जात होते.
दरम्यान, वारंगा फाटा येथील वळण रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. दोघे जोरात रस्त्यावर आदळले. वाहन सुरू असल्याने दुचाकीवरील दोघांचा चेंदामेंदा झाला, तर दुचाकीही अतोनात नुकसान झाले आहे.
ट्रकचालकाचे घटनास्थळावरून पलायन
हा अपघात एवढा भयंकर होता, यामध्ये दुचाकीवरील दोघांचा रस्त्यावरच चेंदामेंदा झाला. तर रक्त अन् पोटातील आतडे सर्वत्र पडले होते. या विदारक परिस्थितीवरून अपघाताची भीषणता लक्षात येते. एवढी भयंकर परिस्थिती घडल्यानंतर ट्रकचालकाने मात्र घटनास्थळावरून पलायन केले आहे.
घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिसांनी घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र कुंडेकर, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने धाव घेतली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तर मोठा जमाव एकत्र जमला होता. जमाव आक्रमक होण्यापूर्वी पोलिसांनी वातावरण शांत केले. नंतर ट्रकचालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
हेही वाचा - रजनीकांत राजकारणात येणार की नाही?, सस्पेन्स कायम
हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचा शिवसेना प्रवेश आज नव्हे तर उद्या