हिंगोली - शहर वाहतूक शाखेच्या वतीने मागील काही दिवसांपासून नियमाचे उल्लघन करणाऱ्यांच्या पावत्या फाडून वाहतुकीला शिस्त लावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र, खरोखर ज्या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहे. तिकडे मात्र वाहतूक शाखा वळूनही पाहत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण होऊन बसले आहे. 'आजार म्हशीला अन, इंजेक्शन पखालीला' याचाच प्रत्यय काही दिवसांपासून नागरिकांना येत आहे.
हिंगोली येथील वाहतूक शाखेत नव्यानेच रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याला काही प्रमाणात यशही येत आहे. मात्र, ऊठ सूट कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांचा ताफा उभा करून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्याचा सपाटा लावला आहे. वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढते दंडाचे आकडे अन पावत्याची संख्या पाहून खरोखरच वाहतुकीला शिस्त लागली का? याचीच चर्चा जोरात सुरू आहे.
एवढेच नव्हे तर 'दादा', 'बापूच्या' गाड्याला अभय दाखवीत सर्वसामान्यांची वाहने मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटत नाहीत हे विशेष. शहराच्या अति वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गांधी चौकात फळ विक्रेत्यांच्या हात गाड्यांचा रस्त्याच्या कडेलाच अक्षरशः गुंता दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होते. तसेच जवाहर रोडवर रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहने लावली जात असल्याने येथुन वाहने काढताना नागरिकांना नेहमीच मोठी कसरत करावी लागते.
वाहतूक शाखेत रुजू झालेल्या अधिकाऱ्यांमुळे या रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागेल अशी आशा नागरिकांना होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या बाहेरच पावत्या फाडण्याचा जोर सुरू असल्याने, नागरिकांच्या अपेक्षावर पाणी फिरल्यागत होत आहे. तसेच हिंगोली जिल्हा हा तीन वर्षांपासून दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. तर ग्रामीण भागातील ग्रामस्थ नडलेल्या परिस्थितीत घरून येताना मोजकेच पैसे सोबत आणतात. मात्र, अशाही परिस्थितीत दंड आकारला तर रिकाम्या हातानेच परतण्याची वेळ येत आहे.