हिंगोली - जिल्ह्यात तीन ते चार दिवसापासून पाऊस अधून मधून हजेरी लावत आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि, अचानक दुपारून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा होती, ती आता संपली असून आता पेरणीसाठी एकच घाई होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
यावर्षी मृर्ग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी चिंतातुर झाला होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील तीन ते चार दिवसापासून पाऊस हिंगोली जिल्ह्यातील काही भागात अधून मधून हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकरी पेरणीकडे वळले आहेत.
जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर पेरणीला सुरुवात केली होती. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा वेग वाढल्यामुळे पेरणीला गती येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या वतीनेही 65 मी पाऊस पडेपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अधूनमधून हजेरी लावत असलेल्या पावसामुळे सध्या बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे तो आता पेरणी करून घेण्याकडे लक्ष देत आहे.
सेनगाव, कळमनुरी वसमत या तीन तालुक्यात पेरणीला काही प्रमाणात गती आल्याचे दिसून येत आहे. तर अनेक दिवसांनंतर आता शेतकरी खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर धाव घेत आहेत.