हिंगोली - नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात हिंगोली जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा तांडा येथील वीरमरण आलेला जवान संतोष चव्हाण याला अगदी लहानपणापासूनच वर्दीसह चार चाकी गाडीचे आकर्षण होते. तो आपल्या आई-वडिलांना आणि बहिणींना नेहमीच त्यांच्या भाषेत म्हणत, ''मार याडी, बाप, थेन, छचावर, येनेन एक वेळ गाडी मा फराचर इच्छा च'' (तुम्हा सर्वांना एकदा तरी गाडीमध्ये फिरवायचे आहे). मात्र, त्याची ही अखेरची इच्छा अपूर्ण राहिली, असे संतोषचे चुलत काका गणेश चव्हाण यांनी सांगितले.
नक्षली हल्ल्यात पंधरा जेवनांना वीरमरण आलेल्या, यामुळे संपूर्ण देशावरच शोककळा पसरली आहे. यात संतोष चव्हाणही शहीद झाले. घटना घडली तेव्हापासून गावामध्ये शोककळा पसरली आहे.
संतोष यांच्या आई-वडिलांना घडलेल्या घटनेची जराही कल्पना देण्यात आलेली नव्हती. संतोषचे वडील संतोषच्या घराशेजारी असलेल्या मित्राला वारंवार फोन करून घटनेची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना काहीच कळू दिले जात नव्हते, तरीही त्यांना काही तरी घडल्याची शंका आल्याचे खुद्द संतोषचे वडील देविदास चव्हाण यांनी सांगितले.
संतोष यांना शेवटचे डोळे भरून पाहण्यासाठी ब्राम्हणवाडा तांडा येथे नातल जमले आहेत. त्याच्या पाचही बहिणी येथे आल्या असून त्या त्यांची आठवण काढून अश्रू ढाळत आहेत. आईची प्रकृती खालावतच चालली आहे. संतोष यांच्या वडिलांना शुगरचा त्रास असल्याने ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुलाच्या आठवणीने तेही व्याकूळ झाले आहेत.
संतोष लहानपणापासूनच मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचा होते. त्यामुळे ते गावात सर्वांचे आवडते होते. ते जेव्हा सुट्टीसाठी गावात येई तेव्हा प्रत्येकाची भेट घेतल्याशिवाय परत नव्हते, असे त्यांचे नातलग सांगत आहेत. एवढेच नाही, तर कर्तव्यावर असतानाही ते गावातील मित्र मंडळींच्या नेहमीच संपर्कात राहत. त्यामुळे संतोष यांचे मित्र मंडळही आठवणींना उजाळा देत आहेत. जवान संतोष कर्तव्यावर जाण्याच्या काही तासांपूर्वीच त्याच्या लहान बहिणीसोबत बोलले होता. मोठ्या बहिणीच्या मेहुण्यासोबतही बोलल्याचे बहिणी रडून-रडून सांगत होत्या. ते म्हणत होते, कुटुंबातील लग्न समारंभासाठी गावी आल्यानंतर आपण सर्वजण मिळून आनंद लुटू. ते नेहमीच चेष्टा करत असत, असे त्यांचे मेहुणे सांगतात.
संतोष म्हणत होते, 'दाजी माझी बहिणीसाठी वाटेल ते करायची तयारी आहे. तुम्ही माझे काळीज जरी मागितले तरी मी देण्यास तयार आहे. आता खरोखरच माझ्या मेहुण्याने देशासाठी काळीज काढून दिल्याचे संतोष यांच्या मेहुण्यांनी सांगितले. घरात अंत्यविधीसाठी फुलांच्या माळा बनविणे सुरू होते, त्या फुलांकडे बघूनदेखील अनेकांना अश्रू अनावर होत होते. त्यामुळे डोळे पुसतच माळा बनविण्याचे काम सुरू होते.
ग्रामपंचायत एक हजार वृक्षाची लागवड करून संतोष यांना वाहणार श्रद्धांजली -
जवान संतोष चव्हाण यांना त्यांच्या मुलाचे आधार कार्ड काढायचे असल्याने, तो ग्रामपंचायतीच्या संपर्कात होता. त्याने ग्रामसेवकासोबत अनेकदा संपर्क साधून मला माझ्या मुलांचे आधार कार्ड काढायचे आहे. त्यामुळे रहिवासी प्रमाणपत्र व इतर लागणारे कागदपत्र मला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करा, अशी विनंती करत होता. त्यामुळे ग्रामसेवक सूरज शमशेट्टीवार यांनी त्याला वेळीच कागदपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
शेतामध्येच केले जाणार अंत्यसंस्कार -
जवान संतोष चव्हाण यांची गावापासून काही अंतरावरच शेती आहे. त्यांच्यावर शेतामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या ठिकाणी मंडप टाकण्यात आला असून, ट्रॅक्टरद्वारे रस्ता करण्याचे कामही सुरू आहे. संतोष चव्हाण यांचे पार्थिव गडचिरोली येथून निघाले आहे. शुक्रवारी जवान संतोष चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होती.