हिंगोली - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच भांबावून गेले आहेत. हे चोरटे घराबरोबरच मंदिरातील दानपेट्याही फोडत आहेत. चोरट्यांनी चौथ्यांदा एकाच मंदीरातील दानपेटी चोरली आहे.
हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील वैजापूर येथील वैजनाथ संस्थान गड महादेव मंदिरात असलेली दानपेटी तब्बल 4 वेळा फोडली आहे. चोरटे ही दानपेटी मंदिरातून काही अंतरावर नेतात आणि त्याठिकाणी फोडून त्यातील दान लंपास करतात. तीन वेळा फोडलेल्या पेटीचा अजूनही तपास सुरू असतानाच आता पुन्हा दानपेटी चौथ्यांदा फोडल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस नेमका तपास तर करतात का? पोलिसांच्या तपासावर सर्वसामान्य नागरिकांतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यावेळेसही चोरट्याने नामी शक्कल लढवत गावापासून जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ही दानपेटी फोडून त्यातील पैसे लंपास केले. दानपेटी मध्ये नेमके किती दान जमा झाले होते. हे अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. अद्यापपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र एकाच मंदीरातील चौथ्यांदा दानपेटी फोडल्यामुळे चोरटे हे परस्परातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.