हिंगोली - जिल्ह्यातील कडती येथील युवकाने चांगेफळ शेतशिवारात असलेल्या विहिरीत रविवारी सायंकाळी उडी घेतली होती. त्यामुळे ३ दिवसापासून या युवकाचा शोध सुरू होता. दरम्यान, तिसऱ्या दिवशी युवकाचा मृतदेह गाळात रूतलेल्या अवस्थेत आढळून आला.
नितीन वाघमारे (वय २२) असे युवकाचे नाव आहे. सदरील युवकाने आपल्या आजोबाला पाच मिनिटात जाऊन येतो असे म्हणून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो थेट चांगेफळ शिवारातील एका सावकाराच्या विहिरीवर जाहून पोहोचला. यावेळी त्याने विहिरीच्या कडेला दुचाकी उभी करत, कपडे, मोबाईल, पैसे बाहेर काढून ठेवत विहिरीत उडी घेतली.
हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांनी पहिला होता. पण सुरुवातीला कोणी लक्षच दिले नाही. मात्र, तो घरी न परतल्याने कुटुबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्याने विहिरीत उडी घेतल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली.
विहिरीत ५० ते ६० फूट पाणी असल्याने सर्वप्रथम विहिरीत गळ टाकून शोधाशोध केली. मात्र, तो सापडला नाही. शेवटी २ विद्युत मोटारीच्या साहाय्याने पाणी उपसा सुरू करण्यात आला. विद्युत वितरण कंपनीनेही या भागातील विद्युत पुरवठा खंडीत होऊ दिला नाही. घटनास्थळी तीन दिवसांपासून ग्रामस्थ व नरसी पोलीस तळ ठोकून होते.
अखेर तिसऱ्या दिवशी पहाटे नितीनचा मृतदेह गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह दिसताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मृतदेह बाहेर काढण्यास आला असून पंचनामा सुरू आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. नितिनचे कडती येथे केशकर्तनालयाचा व्यवसाय आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.