हिंगोली - तालुक्यातील खांबाळा येथे रविवारी पहाटेच्या सुमारास तीन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. चौथ्या घरी डल्ला मारण्यासाठी चोरटे पोहोचले, तोच त्या घरी सर्वच जण जागी असल्याने चोरट्याचा डाव फसला आणि त्या चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान, याच वेळी खांबाळा गावाच्या रस्त्यावर विजेचा धक्का लागलेल्या अवस्थेतील एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. तेव्हा स्थानिकांनी पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हिंगोली शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खांबाळा येथे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास तीन घरांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला. चौथ्या घरी चोरटे डल्ला मारण्यासाठी पोहोचले. मात्र, त्या घरातील लोकांना जाग आली आणि चोरट्यांनी पळ काढला. तेव्हा त्या घरातील लोकांनी ओरडून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले.
याचदरम्यान, गावापासून जवळच असलेल्या रस्त्याच्याकडेला एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाजवळ विजेची तार तुटलेली होती. त्यामुळे त्या माणसाचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, हा अनोळखी व्यक्ती होता तरी कोण ? याची चर्चा रंगली आहे. मात्र, हा मृतदेह त्या चोरांच्या टोळीतील एकाचा असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.