हिंगोली - नगरपालिका वर्षभरापासून शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम राबवत आहे. पालिकेने अद्यापपर्यंत १६ दुकानदारांकडून ९७ किलो प्लास्टिक जप्त करत दंडात्मक कारवाई केली आहे. प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम अनेकदा दुकानदारांना समजावून सांगितले आहेत. याचा दुकानदारांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे आता पालिकेने प्रत्येक दुकान चालक संघटनांच्या नावाने थेट 'प्लास्टिक' बंदीची नोटीस काढली आहे.
शहरात प्लास्टिक वापरासंदर्भात संबंधित दुकांनदारांना आपल्याकडील प्लास्टिक नगरपालिकेकडे सुपूर्द करण्याबाबतच्या सूचना पालिकेने दिल्या होत्या. मात्र, दुकानांदाराकडून याकडे दुर्लक्ष करत सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरूच होता. त्यामुळे आता नगरपालिकेन कडक भूमिका घेतली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांना सूट दिली जाणार नसल्याची तंबी पालिकेने नोटीसद्वारे दिली आहे. एव्हढेच नव्हे तर ७ विविध संघटना, १५ असोसिएशन, तर हॉटेलचालकांसह मांस विक्रेत्यांना वैयक्तिक नोटीस बजावल्या आहेत.
वैयक्तिक नावाने बजावलेल्या नोटीस मुळे विविध असोसिएशन संघटना आणि मांस विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या वतीने ही शेवटची नोटीस असणार आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर आढळून आल्यास, थेट संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पालिकेने या नोटीसद्वारे दिला आहे.
शहरातील जबाबदार नागरिक पालिकेच्या या उपाययोजनांकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे. मात्र आता नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांची खैर नसल्याचे अध्यक्ष बाबाराव बांगर व सीओ रामदास पाटील यांनी सांगितले आहे.