हिंगोली - शहरातील एकूण ७ परीक्षा केंद्रावरून शिक्षण विभागातर्फे भावी शिक्षकांची टीईटीची दोन सत्रात परीक्षा घेतली जात आहे. मात्र, आदर्श महाविद्यालय या केंद्रावर १० वाजून १० मिनिटाला मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने २० ते २५ भावी शिक्षकांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली. याबाबत परीक्षार्थ्यांचा गोंधळ उडताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. परिक्षार्थ्यांनी विनंती केली, मात्र काहीही उपयोग झाला नाही. एकंदरीतच लेट लतीफ गुरुजींनी परीक्षा विभागाच्या नियमावलीचा चांगलाच फटका बसला आहे.
शिक्षक, अध्यापक पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आज(रविवारी) हिंगोली शहरातील एकूण ७ परिक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये ३९२६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असून परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला. तर, आदर्श महाविद्यालय परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना यायला १० मिनिटे उशीर झाल्याचे कारण सांगून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
वास्तविक पाहता परीक्षेसाठी येणार्या एका भावी शिक्षिकेच्या चिमुकलीला रस्त्यात अचानक उलटी जुलाबचा त्रास झाल्याने ती केंद्रावर १० मिनिटं उशिरा पोहोचली. तर, इतर शिक्षकही ५ ते १० मिनिटं उशीरा आले होते. त्यामुळे त्यांना उशिराचे कारण सांगत प्रवेश त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, या प्रकाराने केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता.
हेही वाचा - कामगार साहित्य वाटपात दलालांचा सुळसुळाट; कामगारांचे बेहाल
पोलीस पथकाने केंद्रावर धाव घेतली असता भावी शिक्षकांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना तर विनंती केलीच वरून जिल्हाधिकाऱ्यांना देखील परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यासंदर्भात विनंती केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या विनंतीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे २० ते २५ शिक्षक हे टीईटी परिक्षेपासून वंचित राहिले आहेत. या सर्व प्रकाराने परीक्षार्थी परीक्षा केंद्राबाहेर संताप व्यक्त करत बसले होते. शिक्षकांना परीक्षा विभागाच्या नियमाचे पालन न करणे चांगलेच भोवले आहे. तर, यावरुन वेळेचे महत्वही गुरुजींच्या लक्षात आले. गुरुजींनाच जर वेळेच भान नसेल तर पुढे काय होईल? हेच यावरुन एकंदरितपणे दिसून आले.
हेही वाचा - हिंगोलीतील सारंग स्वामी यात्रा महोत्सव : 529 वर्षांची परंपरा, भाजीच्या महाप्रसादाची पर्वणी