हिंगोली - कोरोना महामारीने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. यामध्ये तर शाळांची दारे बंद असल्याने, विद्यार्थ्यांचे कधी न भरून निघणारे फार मोठे नुकसान झाले आहे. मात्र अशाही ही परिस्थितीमध्ये बरेच शिक्षक हे कोरोनाचे कारण समोर करून हातावर हात देऊन कोरोना महामारी संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे कोरोनाचे भांडवल न करता यातूनही विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दारोदार फिरून विद्यार्थी गोळा करत त्यांना शिक्षणाचे धडे देणारे बरेच शिक्षक आहेत, ईटीव्ही भारतने त्यांचा शोध घेऊन त्याच्यांविषयी हा विशेष रिपोर्ट बनवला आहे.
कोरोनातही दिले विद्यार्थांना धडे -
देविदास गुंजकर असे या शिक्षकांचे नाव आहे. ते कळमनुरी तालुक्यातील पुयना येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत. ते नेहमीच विद्यार्थ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या शैलीतून शिक्षण देतात, त्यामुळे ही शाळा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलीच परिचित आहे. शिक्षणाचे धडे गिरवत असताना अचानक संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट आले. आणि या संकटामध्ये शाळा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र गुंजकर यांनी ज्ञानाची गंगा ही सुरूच ठेवली. अनेक जण हातावर हात ठेवून कोरोना हे संकट जाण्याची प्रतीक्षा करत होते. मात्र, गुंजकर त्याला अपवाद ठरले आहेत. ते कोरोना महामारीच्या काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुयना येथे घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना धडे देत होते. त्यांचा हा आजही उपक्रम सुरूच आहे, त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायमची शिक्षणाची गोडी राहण्यास मदत झाली.
गुंजकर यांना लागलाय विद्यार्थ्यांचा लळा -
शिक्षक गुंजकर यांना विद्यार्थ्यांचा एवढा लळा लागला आहे की, ते एकही दिवस या विद्यार्थ्यांची शाळा बुडवत नाहीयेत. ते नेहमीप्रमाणे त्या गावांमध्ये जाऊन ठरलेल्या वेळेमध्ये विद्यार्थी एकत्र घेतात, अन त्यांना शाळेत शिकविल्याप्रमाणेच शिक्षणाचे धडे देतात. शिक्षकांचा हा उपक्रम पाहून पालक ही अवाक झाले आहेत. गावात जाऊन गल्ली बोळात जाऊन विद्यार्थ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत शिक्षण देत आहेत. त्यांची शाळा ही एकही दिवस बंद राहात नाही. 365 दिवसही त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थी धडे गिरवत आहेत. या कोरोना महामारीच्या काळात देखील गुंजकर यांनी शाळा बंद ठेवली नाही.
मुलांचे स्थलांतर थांबले -
सध्या पालकांचा इंग्रजी शाळेकडे कल वाढला आहे. त्यामुळे अनेक पालक हे आपल्या पाल्यांना मराठी शाळेतून काढून इंग्रजी शाळेमध्ये दाखल करत आहेत. मात्र, जिल्ह्यातील ही एकच अशी शाळा आहे ज्यामध्ये विद्यार्थी हे इंग्रजी शाळेकडे न जात इथेच शिक्षण घेत आहेत.
गुंजकर अनेक पुरस्काराचे ठरले मानकरी -
गुंजकर यांच्या शिक्षण पद्धतीने अनेक पालकांची मने तर जिंकलीच आहेत. त्यांनी केलेल्या या अविरत कार्यामुळे ते अनेक पुरस्काराने देखील सन्मानित झाले आहेत. यामध्ये २०१७चा जिल्हा परिषद हिंगोलीचा उत्कृष्ट पुरस्कार तर २०१६चा पंचायत समिती कळमनुरीचा गुरू गौरव पुरस्कार, तसेच आस संघटनांचा राज्य स्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, शिक्षण समिती हिंगोली तर्फे दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, गायत्री शांती धाम हिंगोली तर्फे दिला जाणारा २०१८चा गुरू गौरव पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्कार : थीमथडी शिक्षण संस्था दौड पुणेतर्फे, संजीवनी ट्रस्ट पुणेतर्फे सत्कार व एक लाख रुपयांची आर्थिक मदत, विशेष म्हणजे ती मदत देखील स्वतः न घेता सर्व रक्कम शाळेसाठी खर्च करण्यात आली आहे. २०१९ चा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे औरंगाबाद येथे वितरण आणि २०२०चा सावित्रीबाई फुले समाज शिक्षक पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
मिसकॉल दो ओर कहाणी सुनो -
लॉकडाऊनच्या काळात हा एक उपक्रम प्रभावीपणे राबविला असल्याचे कुंदर्गे सांगतात, यामध्ये एका नंबरवर मिस कॉल दिला, की गोष्ट ऐकविली जात असे. या उपक्रमात माझे १०० टक्के विद्यार्थी सहभागी होत असत. हा उपक्रम मी वयक्तिक, जोडीत, गटात राबविला. या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालक, लहानमुले ही सहभागी होत असे. विशेष म्हणजे मुले ज्या ज्या गोष्टी ऐकत असे त्यांची नोंद ही वहीत घेत असल्याचे गुंजकर यांनी सांगितले.
हेही वाचा - दाभोलकर हत्या प्रकरण: पाचही प्रकरणात यूएपीए कायदा लागू करा, सीबीआयची न्यायालयाकडे मागणी