हिंगोली - सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे एक गाव. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी या गावकऱ्यांनी शेवटी गावच विकण्याचा निर्णय घेतला आहे. या आशयाचे फलक या गावात लावण्यात आले होते. मंगळवारी या गावातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
निसर्गाच्या अवकृपा आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे गाव जरी सधन असले तरी शेतकरी परिस्थितीने नडलेले आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी असमर्थ झाले आहेत. बँक पीककर्ज देत नसून, कर्जमाफीचाही येथील शेतकऱ्यांना कोणताही फायदा झालेला नाही. पीकविमा भरला मात्र परतावा मिळालाच नसल्याने शेतकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांनी गाव विक्रीस काढून आजपासून उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत माझ्या बापाचं कर्ज माफ होणार नाही, मी शाळेत जाणार नाही
ताकतोडा गावातील शेतकऱ्यांनी एकीकडे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर आपल्या आई-वडिलांच्या डोक्यावर असलेल्या कर्जामुळे व्यथीत असलेल्या त्यांच्या मुलांनीही 'जोपर्यंत माझ्या बापाचं कर्ज माफ होणार नाही, मी शाळेत जाणार नाही' असा निर्धार केला आहे.
अधिकाऱ्यांची धावपळ नेते मात्र अजूनही झोपेतच
गावकऱ्यांनी गाव विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर अधिकारी धावपळ करीत गावकऱ्यांची समजुत काढण्याच प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधी मात्र जसा वेळ मिळेल तशीच गावाची भेट घेत आहेत. आता शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून, आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवता मंदिरातच शाळा भरवली आहे.
आमदार रामराव वडकूते यांनी आज ताकतोडा या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी सवांद साधला. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी वडकूते यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला. एवढेच नव्हे तर निर्णय लागे पर्यंत आम्ही आमचे पाल्यांना अजिबात शाळेत पाठवणार नाही आणि उपोषणही सोडणार नाही असा निर्णय घेतला. ही परिस्थिती केवळ ताकतोडा गावावर नाही. या भागातील अनेक गावे कर्जबाजारीमुळे हैराण झाली आहेत.