हिंगोली - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कृषी अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांसमोरच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तर पीक विमा देखील अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाहीय. यांसह अन्य प्रश्नांवर संतप्त होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोड केली. मात्र अद्याप याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

ऑनलाईन अर्ज करूनही बँकेत कर्ज मिळाले नसल्याने सध्या शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशा विविध प्रश्नांवर आज शेतकरी स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर खुर्च्यांची तोडफोड केली. अचानक घडलेल्या प्रकाराने अधिकारी-कर्मचारी गोंधळून गेले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी सुरू केली आहे.
कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या असून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.