हिंगोली- विद्युत विभागाने तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे शेतकऱ्यांकडून 12 लाख रुपये घेतले होते, त्याबदल्यात 90 खांब उभारून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र तोच विद्युत पुरवठा अनधिकृत ठरवत या शेतकऱ्यांवर विद्युत अभियंत्याने गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अभियंत्यावर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. अखेर या अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा- दौंड तालुक्यात ताडीची अवैध वाहतूक, ५ लाखाचा मुद्देमाल जप्त
कनिष्ठ अभियंता सुरेश सिंग राठोड, दत्ता अंभोरे आणि हनुमान जाधव अशी निलंबित करण्यात आलेल्या विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या अभियंत्याने शेतकऱ्यांकडून 12 लाख रुपये घेतले, त्याबदल्यात 90 खांब उभारून विद्युत पुरवठा सुरू केला. मात्र ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या कामाची चौकशी करून, हे काम अनधिकृत असल्याचे सांगितले. तसेच या शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकाराने गोंधळून गेलेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून, विद्युत पुरवठा विभागाच्या या अजब प्रकाराविरोधात तक्रार केली होती. अखेर शेतकऱ्यांची दखल घेऊन या अभियंत्याचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे विद्युत कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.