हिंगोली - येथील तालुका पुरवठा विभागाने एका निलंबित केलेल्या रेशन दुकानदाराला रेशनचा पुरवठा केल्याचा मुद्दा आता चांगलाच गाजत आहे. त्या दुकानदाराला कोणत्या कागदपत्राआधारे पुरवठा केला त्या कागदपत्रांच्या मागणीसाठी आज काही लाभार्थी आत्मदहन करणार होते. मात्र, तहसीलदार गजानन शिंदे यांनी येत्या ३० दिवसात माहिती देण्याचे लिखित आश्वासन दिले. त्यामुळे लाभार्थ्यांनी आत्मदहन मागे घेतले. मात्र, ३० दिवसात माहिती न दिल्यास पुन्हा तहसील परिसरात आत्मदहन करणार असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
वैजनाथ पावडे आणि गणेश ढोने असे या दोघांची नावे आहेत. हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील एका रेशन दुकानदाराला लाभार्थ्यांच्या विविध तक्रारीवरून २ महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. मात्र, सदरील दुकानदाराने तहसीलदार व पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून रेशनचा माल निलंबित केलेल्या दुकानात उतरवून घेतला. तेव्हापासून हा मुद्दा हिंगोलीत चांगलाच चर्चेत आला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या दुकानदाराला निलंबित करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार निलंबित केलेल्या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर 'मी स्वतः राजीनामा दिला असल्याचे' फलक दर्शनी भागात लावले होते. त्यानुसार निलंबित केलेल्या दुकानदाराचे रेशन दुकान हे दुसऱ्या गावातील दुकानदारकडे जोडले होते. मात्र, त्यालाही धमक्या देण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर अचानक काही दिवसातच थेट निलंबित केलेला दुकानदार ट्रकमधून रेशन उतरवत असल्याचे पाहून लाभार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
वास्तविक पाहता याच दुकानदारासंदर्भात रेशन लाभार्थ्यांना धान्य न देत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर याच रेशन दुकानदाराला निलंबित करण्याच्या मागणीसाठी लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल घेत आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला होता. याची प्रशासनाने दखल घेत सदरील दुकानदाराला निलंबित केले होते. मात्र, पुन्हा त्याच ठिकाणी धान्य दिल्यामुळे लाभार्थी चांगलेच गोंधळात पडलेले आहेत.
त्या रेशन दुकानदाराला धान्य पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कोणत्या कागदपत्राद्वारे रेशन पुरविले याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज हे दोन लाभार्थी आत्मदहन करणार होते. मात्र, ३० दिवसाचे आश्वासन दिल्याने त्यांनी हे आत्मदहन पुढे ढकलले. विशेष म्हणजे निलंबित केलेल्या याच रेशन दुकानदाराने मृत व्यक्तीच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून रेशन उचलल्याचा आरोप आत्मदहनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता खरोखरच ३० दिवसात माहिती दिली जाणार का? की तहसीलदार गजानन शिंदे हे त्या आत्मदहनकर्त्यांना तारीख पे तारीख देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर तहसीलदार यासंदर्भात बोलण्यास स्पष्ट नकार देत आहेत.