हिंगोली - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणात सध्या मृत साठा आहे. त्यामुळे हिंगोली नगरपालिकेच्या वतीने शहराला कधी चार तर कधी पाच दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे. जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा पुरणार असल्याचा अंदाज हिंगोली नगरपालिका विभागाचा आहे. पर्जन्यमान लांबले तरी शहराच्या पाणीपुरवठ्यात खंड पडणार नाही. फक्त दिवस वाढण्याची शक्यता आहे.
शहराला पाणी पुरेल एवढा सध्या स्थितीमध्ये या धरणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या ठिकाणाहून अधून-मधून पाण्याची होत असलेली चोरी ही पाण्यामध्ये घट निर्माण करणारी आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास निश्चितच पाण्याची चोरी थांबल्याने हिंगोली शहराला पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. हिंगोली नगरपालिकेच्या वतीने ५.१५ दलगमी एवढे वर्षभरासाठी पाणी आरक्षित केलेले आहे. एखाद्या दिवशी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास एक दोन दिवस विलंबाने, शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, चार ते पाच दिवसाआड नियमित नगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात असून पाणीटंचाईच्या काळात पाण्याची वेळ एक तासापेक्षा 15 मिनिटाने कमी केली जाते.
तर कळमनुरी शहराला ईसापूर धरण येथून पाणीपुरवठा केला जातो. सध्या स्थितीमध्ये या धरणात ४ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असून, दोन दिवस आड नगरपालिकेच्यावतीने पाणीपुरवठा सुरू आहे. सेनगाव शहरास येलदरी धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. सध्या हता नाईक तांडा पर्यंत पाईपलाइनचे काम अंतिम टप्यात आले आहे. तर वसमत शहरालादेखील सिद्धेश्वर धरणावरूनच पाणीपुरवठा होतो. सध्या टंचाईत आठ दिवस आड तर पावसाळ्यात तीन दिवस आड पाणीपुरवठा होतो. ओंढा शहरालगत असलेल्या तलावातून पाणी पुरवठा होतो. या तलावात मुबलक प्रमाणात पाणी असले तरीही केवळ नगरपंचायतीच्या नियोजन अभावामुळेच नियमित पाणी पुरवठा होण्याऐवजी दोन, कधी तीन दिवस आड पाणीपुरवठा होतो.