हिंगोली - विनापरवाना शालेय पोषण आहार दिल्याप्रकरणी डिग्रस कऱ्हाळे येथील मुख्यध्यापक एकनाथ कऱ्हाळे यांच्यासह जिल्ह्यातील इतर दोन मुख्यध्यापकांना अन्न औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पाच लाख रुपये दंड आणि सहा महिने शिक्षा का करण्यात येऊ नये, सा सवालही या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. नोटीस हातात पडताच कऱ्हाळे यांची प्रकृती खालावली आहे.
हेही वाचा - हिंगोलीत दुसऱ्यांदा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा अपहार वाढला आहे. परभणी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी जिल्ह्यातील काही शाळांना भेटी दिल्या. १३ ऑगस्ट डीग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ कऱ्हाळे शाळेत पोषण आहाराचे कामकाज करताना आढळले. दरम्यान, नोंदणी प्रमाणपत्राची मुख्यध्यापकांकडे विचारणा केली असता, नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे मुख्यध्याकांनी सांगितले. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कलम 63 नुसार नोंदणीशिवाय आहारासंबंधीत व्यवसाय केल्यास सहा महिन्याची शिक्षा व पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. याच कायद्याअंतर्गत प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे. तसेच मुख्याध्यापकांना सात दिवसाच्या आत खुलासा करण्याची सूचनादेखील देण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर डीग्रस कऱ्हाळे येथील ग्रामस्थ संतापले आहेत. अन्न व औषध विभागाच्या अजब कारभाराविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. नोटीसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, कऱ्हाळे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.