हिंगोली - देशभरासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर चार नराधमांनी बलात्कार करुन तिला जाळून टाकले. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. देशभरात संतापाची लाट पसरली. तसेच, जालना येथील 13 वर्षीय बालिकेवर आरोपींनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात ऐका शेतात 23 दिवस अत्याचार केला. या वरूनच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळेच महिलांच्या संरक्षणार्थ पोलिसांसोबत शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान, 'तुम्ही हाक द्या, मी साथ देईन' हा उपक्रम हाती घेतल्याचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'सैराट'ची पुनरावृत्ती; आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केले मुलीच्या शरीराचे तुकडे
या उपक्रमासाठी वाहने देखील उपलब्ध करून ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कारभार सांभाळत आहेत. असे असताना चक्क सेनेच्या आमदारांना महिलांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा बनला आहे. आता या उपक्रमाला कितीप्रमाणात साथ मिळेल, हे पाहण्यासारखे असणार आहे.
शिवसेनेच्यावतीने या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी फलकबाजी करण्यात येणार आहे. मात्र शिवसेनेच्या या उपक्रमाची कोणतीही कल्पना पोलीस प्रशासनाला नसल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, 9 दिवस फ्रीजमध्ये ठेवला मृतदेहाचा अर्धा भाग