हिंगोली - जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेनातर्फे रास्ता रोको करण्यात आले. यावेळी रस्त्यावर बैलगाडी आडवी लावून अन् रस्त्यावर मुसळधार पावसाने भिजून सडून गेलेले सोयाबीन टाकून रास्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गावर काहीकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा... 'प्रदूषणमुक्त' भारतासाठी 11 दिवसांत पनवेल ते कन्याकुमारी सायकल प्रवास
हिंगोली जिल्ह्यात सलग नऊ दिवस झालेल्या संततधार पावसाने खरीप पीक झोडपून काढले. या संकटाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. मागील काही दिवसांपासून प्रशासन स्तरावर पंचनामे सुरू असले तरीही अजून बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे बाकी आहेत. तर दुसरीकडे राज्यात अजूनही सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकऱ्यांना नेमकी आर्थिक मदत मिळेल तरी कशी ? हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळेच मराठा शिवसैनिक सेनातर्फे कामठा फाटा येथे रास्ता रोको करून, शेतकऱ्यांना वेळीच मदत देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मदत देण्यास टाळाटाळ केल्यास भविष्यात आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. जवळपास एक तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे नांदेड-हिंगोली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा... डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ही 'अजब' नोटीस पाहिलीत का?