हिंगोली- काही केल्या काळ्या बाजारात होणारी रेशनची विक्री कमी होत नाहीये, काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्य दुकानातील ३४१ क्विंटल गहू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या लिंबाळा भागातील एमआयडीसी परिसरात पकडला. गहू व ट्रक असा एकूण २७ लाख ३५ हजार ५९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हिंगोली-औंढा लिंबाळा एमआययडीसी येथून ट्रक क्रमांक एमएच २६ बीई २९३५ या वाहनाद्वारे स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात आल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेऊन, ट्रक ताब्यात घेतला व चालकास विचारपूस केली तर चालकाने सदर ट्रकमध्ये गहू आल्याचे सांगून वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथून आणल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी धान्य पावत्यांची तपासणी केली असता पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशीसाठी सदर वाहन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून उभे केले. या वाहनांमध्ये गोरगरिबांना दिले जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातील ७ लाख ३५ हजार ५९३ रुपये किंमतीचा ३४१ क्विंटल गहू आढळून आला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून मंगरूळपीर येथे रवाना केले आहे.
पावत्या बनावट असल्याचे झाले स्पष्ट
वाहन चालकाकडे असलेल्या पावत्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना दाखवण्यात आल्या असता, या पावत्या बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा रेशनचा गहू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी ट्रकचालक किशन नागोराव धुळगुंडे रा. पोलिसवाडी जि. नांदेड यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाहनातील ३४१ क्विंटल गहू व ट्रक असा एकूण २७ लाख ३५ हजार ५९३ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रकचालक किशन नागोराव धुळगुंडे, विनोद ऊर्फ रवि जाधव तसेच त्याचा मुनिम एकूण तिघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उदय खंडेराय हे करत आहेत.