हिंगोली - एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ( Maharashtra ST Worker Strike ) राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून, त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. यातून 63 एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackarey ) यांच्याकडे कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar Wrote Letter To CM ) यांनी केली आहे. शिवसेनेच्या आमदारांनीच सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमदार बांगर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी -
मागील दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर संप सुरू आहे या संपावर अजून तरी सरकारने कोणताही तोडगा काढला नाही, अशातच तुटपुंज्या पगारीमुळे आतापर्यंत 63 कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. एवढी भयंकर परिस्थिती असून कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा अजिबात विचार सरकारने केलेला नाही. त्यामुळे हिंगोलीतील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे इच्छा मरणाची मागणी केली आहे. मागणीसाठी सैरभैर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची दया आलेल्या कळमनुरी विधानसभेच्या शिवसेना आमदारांनी यात धाव घेऊन सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार बांगर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून, त्यांच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा, अशी मागणीच थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
सोशल मीडियावर पत्र व्हायरल -
एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या मागण्या राज्य सरकारकडे पाठविण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे पोहोचूनदेखील अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. त्यामुळेच हिंगोली येथे बंदमध्ये सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी थेट निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली, हीच कर्मचाऱ्यांची अवस्था पाहून कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी कर्मचाऱ्यांची मागणी आता लावून धरली आहे. आमदार बांगर यांनी मुख्यमंत्र्याला लिहिलेले भावनिक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्तच -
एसटी कर्मचारी हे वर्षे तुटपुंज्या पगारावर काम करत होते. त्यामुळेच कर्मचारी आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवत आहेत. त्यामुळे त्यांच्या जे काही मागण्या आहेत. त्या रास्त असून, राज्य शासनाने या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनाने विलीनीकरण करावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. शिवसेना आमदारांनीच या कर्मचाऱ्यांची बाजू थेट मुख्यमंत्र्याकडे मांडल्याने आमदार संतोष बांगर यांची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू असून सोशल मीडियावरदेखील पत्र व्हायरल होत आहे.