हिंगोली : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढलेला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचादेखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अन् जिपतील सर्वच विभाग प्रमुख अशा ४० जणांना सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये अलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले असता, आज हिंगोली प्रशासनास निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला असून, जिल्हा परिषद कार्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. अशाच परिस्थितीमध्ये आता शासकीय कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मुख्य म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचा देखील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने, सर्वांच्याच ह्रदयाचे ठोके वाढले आहेत. सीईओ अन् जिल्हाधिकारी यांच्यावर कोरोनावार्ड मध्ये उपचार सुरू आहेत. तर, सीईओ यांच्या संपर्कात आलेल्या अन् जिल्हा परिषदेतील सर्वच विभाग प्रामुखांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तर, जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून अलगीकरण होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर, एका डॉक्टरसह महसूल प्रशासनातीलही एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने हिंगोली जिल्ह्यात चिंताजनक वातावरण निर्माण झालेले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चाललेली असताना आज जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन ते चार दिवस परिसरात स्मशान शांतता पसरली होती. मात्र, आता पुन्हा एकदा परिसरामध्ये वर्दळ वाढणार आहे.