हिंगोली - सेनगाव येथे काळ्या बाजारात रेशनचा गहू आणि तांदळाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक उमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने रात्री 12 वाजता छापा मारुन खाडेच्या रेशन दुकानातील काळाबाजार उघडकीस आणला. संबंधित कारवाईत 17 लाख 87 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 7 जणांविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.
सेनगाव येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोजिनी खाडे यांच्या रेशन दुकानातील गहू व तांदूळ अवैधपणे रिसोडकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने सेनगाव येथे खाडे यांच्या रेशन दुकानावर छापा मारला. यामध्ये तांदूळ, गहू, हरभरा, तूरडाळीची 224 पोती सापडली. तसेच एक टेम्पो जप्त करण्यात आला असून 7 आरोपींविरोधात सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याच ठिकाणी गुटखा पकडला होता. त्यापाठोपाठ आता ही कारवाई केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोजिनी खाडे यांनी पदावर असताना नातेवाईकांनी कोण कोणते 'प्लॅन-बी' करून ठेवले होते, हे पोलिसांच्या कारवाईत उघड होत आहे. या कारवाईत तर दोन मशीन, दोन बिल मशीन, एका खासगी व्यक्तीच्या घरात आढळून आल्या. त्यामुळे हा अवैध धंदा पूर्व नियोजित असल्याची शंका पोलिसांना आली.
संबंधित कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक उमकांत चिंचोळकर, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, फुलाजी सावळे, महेश बंडे, रुपेश धाबे, विजय घुगे, आडे, बोके, लेकुळे यांनी केली आहे.