हिंगोली - शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी व राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय किसानसभा तसेच आम आदमी पार्टीच्यावतीने शहरातील नांदेड नाका येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरीही सहभागी झाले होते.
कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार -
या नवीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी अनेकदा प्रयत्न केले गेले. एवढेच नव्हे, तर हरियाणा आणि पंजाब येथील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोर्चादेखील काढला. तरीही केंद्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. मात्र, जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन व पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. आर.आर. कोरडे यांनी सांगितले.
रुग्णवाहिकेला दिला रस्ता -
केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेतकरी हे चांगलेच संतापलेले आहेत. या कायद्यांविरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड नाका येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, तेथून रुग्णवाहिका जात असल्याने आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करत माणुसकीचे दर्शन घडवले.
हेही वाचा - केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी केलंय नजरकैद; आम आदमी पक्षाचा आरोप