हिंगोली- जिल्ह्यात आज (बुधवारी) दुपारी दीड वाजलेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांना पेरणीसाठी अजून पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
कोरोना संकटामध्ये सापडलेल्यांना शेतकरी मशागतीची कामे उरकून पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. आता त्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज पावसाने हजेरी लावली मात्र पेरणीसाठी आवश्यक असा पाऊस व्हायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हिंगोलीत आज सकाळपासूनच ढग दाटून आलेले होते. दुपारी दीड वाजलेपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरात ठिक-ठिकाणी साहित्य व खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
पावसामुळे रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके दिसून आले. पावसापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण सहारा शोधताना पाहायला मिळाले.