हिंगोली - पोलीस म्हटलं की त्यांच्याविषयी बहुतांश सर्व सामन्य वाईटच विचार करतात. मात्र, स्वतःचा जीव धोक्यात टाकून हेच पोलीस कर्मचारी देशाची परिस्थिती लक्षात घेऊन सेवेसाठी तप्तर असतात. हिंगोली येथील वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी, आपल्या एका महिन्याचे ७० हजार रुपयांचे वेतन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रिलीफ फंडमध्ये दिले. सोबतच त्यांच्या 24 कर्मचाऱ्यांनी त्यांचे २-२ दिवसांचे असे एकूण 81 दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. ओमकांत चिंचोळकर असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
चिंचोळकर यांनी हिंगोली शहरात वाहतुकीला शिस्त लावली असून, मुजोर दुचाकीस्वार अन चारचाकी चालवणाऱ्यांना चांगलेच वठणीवर आणले आहे. शहरात सुरू असलेल्या टोईंगमुळे तर त्यांच्यावर अनेक दुचाकीचालक खांड देखील खातात. एवढेच नव्हे तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून वाहतुकीच्या नियमांची ओळख करून दिली अन् ती आमलात देखील आणली आहे.
त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक हातभार लावत आपल्या एका महिन्याचा पगार पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये दिला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने, पोलीस अधिकऱ्यांना 24 तास कर्तव्यावर थांबावे लागते. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला असला तरीही पोलीस यंत्रणा सेवा बजावत आहे. अशाच परिस्थितीत कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन अनेकांनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सपोनि चिंचोळकर यांनी एका महिन्याचे तर, वाहतूक शाखेतील इतर 24 कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ३ दिवसांचे ,असे 75 हजार रुपयांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.
वेतन जमा करण्यासंदर्भाचे पत्र सपोनि चिंचोळकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केले आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या पुढाकारामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच आता पोलीस कर्मचारी गरजवंताना जेवणही पुरवत असल्याने खरोखरच हिंगोलीकराना पोलिसांमध्ये माणुसकीचे दर्शन दिसत आहे.