हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील नांदूसा येथे बारा वर्षीय चिमुरडी ही प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित आरोपी बालाजी आडे याने खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. आरोपीविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
बालाजी उर्फ गोपाल आडे (22) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे मृत प्रियंकाच्या मोठ्या बहिणी सोबत प्रेम संबंध होते. प्रेमसंबधात प्रियंका ही अडथळा ठरत होती. अनेकदा तिने दोघांना बोलताना पाहिले देखील होते. वारंवार ती अडथळा ठरत असल्याने आरोपी हा तिच्यावर अनेक दिवसापासून पाळत ठेवून होता. शेवटी प्रियंकाचे आई-वडील हे शेतात कामासाठी गेल्याची संधी साधून आरोपीने घरामध्ये प्रवेश करत प्रियंकाला संपवून टाकले. या घटनेने संपुर्ण गाव हादरुन गेले होते.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, उपअधीक्षक रामेश्वर वैजने, बासंबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक भोसले, सहा.पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, यांच्या पथकाने धाव घेतली. यावेळी घटनेचा पंचनामा सुरू असतानाच पोलिसांनी आजू बाजूला असलेल्याची कसून चौकक्षी केली. एका अल्पवयीन मुलीची ही कसून चोकक्षी केली असता, तिने सर्व प्रकार सांगितला. तर एका युवकाच्या हातावरील बोटाला रक्त लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत खून केल्याचे युवकाने सांगितले. त्यामुळे या प्रकरणी बालाजी उर्फ गोपाल आडे विरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.