हिंगोली - शहरातील अनेक पोलीस ठाण्याचे कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस प्रशासन चांगलेच चर्चेत आहे. आता कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्यावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी सर्व कागदपत्रे जोडून अनुपालन अहवाल अनुसूचित जाती आयोगाकडे पाठवण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या ८ महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक राहिरे यांच्यावर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी जयदीप दिपके यांनी आयोगाकडे केली होती. त्यावेळी पोलीस प्रशासनामध्ये वादळ निर्माण झाले होते. शिवाय वसमत येथील शहर पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार दाखल करून न घेणे ३ पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. मागासवर्गीय आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेतली. तसेच अधून-मधून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचादेखील त्रास काही शिस्तबद्ध असलेल्या ठाणेदाराला सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर एकापेक्षा जास्त लाचलुचपत विभागाच्या कारवाया झाल्याने ठाणेदाराच्या बदल्याही झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या २ दिवसांपूर्वी सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांने अवैध दारू चालू ठेवण्यासाठी दीड हजाराची मागणी केल्याने लाचलुचपत विभागाने कारवाई केली. त्यांच्यावर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या पाठोपाठ आता जी. एस. राहिरे यांचेदेखील प्रकरण अनुसूचित जाती आयोगापर्यंत पोहोचल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शिस्तप्रिय असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या काळात हे सर्व प्रकार सुरू असल्याने नागरिक अचंबित झाले आहेत. एवढेच नाहीतर यापूर्वी स्वच्छ असलेल्या होमगार्ड कार्यालय परिसरातच दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. येथे कार्यरत असलेल्या केंद्रनायकाने अनेक होमगार्डला सळो की पळो करून सोडले आहे. एवढेच नव्हे तर महिला होमगार्डला या केंद्र नायकाचा खूप त्रास आहे. मात्र, भीतीपोटी अनेक महिला होमगार्ड केंद्र नायकाचा त्रास सहन करून घेत आहेत. होमगार्डची उपस्थिती कमी दाखविण्याचा प्रकार नेहमीचाच आहे. अनेक तक्रारी असताना शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षकाने अद्यापही या विभागाकडे वळून पाहिलेले नसल्याची खंत अनेक होमगार्ड व्यक्त करीत आहेत.