हिंगोली- जिल्ह्यात चोहो बाजूने रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. मात्र, १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. कळमनुरी ते वारंगा फाट्यापर्यंत १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची मलिका सुरूच आहे. प्रशासनाकडून या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता पोलिसांवरच खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.
खड्ड्यांमुळे या मार्गावर कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. मात्र, याबाबत तिकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांनाच रस्त्यावर उतरण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. हिंगोलीकडून नांदेड मार्गे जाणाऱ्या रस्त्याची कळमनुरी आणि आखाडा बाळापूर-वारंगा फाट्यापर्यंत अक्षरशः चाळणी झाली आहे. या मार्गावर दिवसागणिक अपघाताची मालिका सुरू आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून संपूर्ण वाहन या खड्ड्यात अडकून पडत आहे. त्यामुळे, नेहमीच वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमान वाढले आहे.
या मार्गावर अपघात झाला की, पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन रात्र-रात्र तर कधी दिवस भर ताटकळत उभे राहून वाहतूक सुरळीत करावी लागत आहे. या मार्गावरून जास्त करून अवजड वाहतूक सुरू असल्याने अवघ्या ८ दिवसात ९ ट्रक पलटी झाले आहेत. त्यामुळे, आज शिवसेनेसोबत बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःहून हातात टिकास आणि खोरे घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला. यातून खाकीतले तर दर्शन झालेच मात्र हिंगोलीचा सार्वजनिक बांधकाम विभाग किती ढिला आहे हे ही या घटनेवरून दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी कळमनुरी येथेही काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून असेच मरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले होते.
हेही वाचा- अवास्तव खर्चाला फाटा देत शिवजयंतीच्या वर्गणीतून पार पाडला विवाह सोहळा