हिंगोली - जिल्ह्यातील येहळेगाव परिसरात २० जूनला कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत स्त्री जातीचे अर्भक आढळले होते. या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे येहळेगाव गवळी येथून एका संशयित महिलेला ताब्यात घेऊन तिची जिल्हासामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. मृत बाळ या महिलेचेचे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र,ते बाळ का फेकून दिले याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील येहळेगाव गवळी परिसरात, शेतशिवारातून एक कुत्रा काही तरी तोंडात घेऊन पळ काढताना ग्रामस्थांच्या निर्दशनास आला होता. त्यामुळे काही जणांनी त्या कुत्र्याचा पाठलाग केला असता, त्याने तोंडातील मांसाचा गोळा फेकून दिला. ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले असता, ते स्त्री जातीचे नवजात अर्भक असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलीस पाटील सचिन मंदारने तत्काळ आखाडा बाळापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला अन कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अर्भकाचे शवविच्छेदन करून नगरपालिकेने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. नंतर पो निरीक्षक गणपत राहिरे, सूर्य, पोटे, गजानन भालेराव यांनी तपासाची चक्रे फिरवली. तर येहळेगाव येथे खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयित स्त्रीला ताब्यात घेतले. तिला जिल्हासामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या स्त्रीच्या पतीचे अपघातात निधन झालेले आहे.
आता नेमके या स्त्रीने हे स्त्री जातीचे अर्भक का फेकून दिले, याबाबत ती वेगवेगळे कारण सांगत आहे. मात्र अर्भक याच स्त्रीचे आल्याचे निष्पन्न झाले असून, हिनेच फेकल्याचे देखील निश्चित झाले आहे. तिची चौकशी केली जात आहे. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत या स्त्रीची तपासणी सुरू होती. तपासात अजून काय समोर येणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, महिलेचे कोणासोबत अनैतिक संबंध तर नसावेत. याबाबत वेगवेगळ्या दिशेने शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.