हिंगोली - दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर शहरात निर्माण झालेला तणाव आणि दगंलसदृश स्थितीला पोलिसच जबाबदार आहेत का ? असा सवाल शहरातील नागरिकांना पडला आहे. सदरील तणावाच्या परिस्थितीमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज पाहून घटनेला पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचे वेगवेगळ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे हिंगोलीचे पोलीस प्रशासन रक्षक आहे की भक्षक, असा प्रश्न समोर येत आहे.
हिंगोलीत दरवर्षी ओम कयाधु अमृत धारा महादेव मंदिर येथून कावड काढली जाते. त्यामुळे यंदा कावड आणि ईद एकाच दिवशी असल्याने पोलीस प्रशासनाचे वाढीव पोलीस बंदोबस्त लावणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी जादा पोलिसांचा बंदोबस्त लावला नाही. तर पोलीस कर्मचारी व दंगा नियंत्रण पथकाने या घटनेनंतर शहरात नागरिकांचा पाठलाग करून रस्त्यावर दिसेल त्याच्यावर लाठीचार्ज केला. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची देखील तोडफोड केली. हे पथक एवढ्यावरच थांबले नाही. बंद घरावर ही दांडे मारले, घरासमोरील लाईट फोडले. नेहमीच कायद्यावर बोट ठेवून चालणाऱ्या पोलिसांचा हा हैवानी प्रकार घराला सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांननी 150 जणांना अटक केली आहे. तर अजूनही काही जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तर या घटनेवेळी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये आमचे प्रतिनीधी संतोष भिसे हे जखमी झाले आहेत. याचा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनेने निषेध नोंदवला आहे. तर आजही जिल्ह्यात काही ठिकाणी ग्रामीण पत्रकार संघटना प्रशासनाला निवेदन देत निषेध नोंदवत आहेत.
पोलीस कर्मचारी निलंबित
या प्रकारानंतर पीएसआय दीपक काशीद यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. गणेश वाबळे, नितीन रामदिनवार, सोनवणे यांना निलंबित करण्यात आले आहे. एकंदरीत या सर्व वादंगाला पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याने, आता यावर वरिष्ट स्तरावरून काय करवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हिंगोली शहरात वातावरण शांत झाले आहे. मात्र, नागरिकांच्या मनात भीती कायम आहे.