हिंगोली - अवैध नळजोडणी घेऊन त्यावर चालवण्यात येणारा बाटली बंद पाणी निर्मितीचा उद्योग नगरपालिकेने बंद पाडला. शहरातील हनुमान नगर भागात हा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती नगरपालिकेच्या पथकाला मिळाली होती. या कारवाईत लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. नगरपालिकेने तोतया ग्राहक पाठवून या कारखान्याची शहानिशा केली होती.
संपूर्ण महाराष्ट्रात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली नगरपालिकेच्यावतीने शहरात प्लास्टिक बंदी मोहीम राबवली जात आहे. शहरातील हनुमाननगर भागात 'गुरू प्रसाद वॉटर प्लॅन्ट' हा बाटली बंद पाण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांना मिळाली. त्यानंतर पाटील यांनी याठिकाणी एक तोतया ग्राहक पाठवून याबाबत शहानिशा केली.
त्यानंतर नगरपालिकेच्या एका विशेष पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये पाण्याच्या पिशव्यांसह प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी वापरण्यात येणारे स्टिकरचे रोलही जप्त केले. याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. कारखान्यातील नळ जोडणीचीही चौकशी सुरू आहे.
नगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या छापा सत्रामुळे शहरातील प्लास्टिक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.