हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथे सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग लागली. यामध्ये गोठा पूर्णतः जळून खाक झाला आहे. यामध्ये म्हशीच्या वगारीचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर शेती साहित्यासह अन्नधान्य देखील जळाले.
शेतकरी देविदास लक्ष्मण खंदारे हे आपल्या पत्नीसह गोठ्यामध्येच वास्तव्य करतात. मात्र, सोमवारी रात्रीच्या सुमारास हा गोठा जळाला. खंदारे यांच्या लक्षात येताच त्यांनी म्हैस व वगारीला सोडण्याचा प्रयत्न केला. म्हशीला सोडण्यात यश आले. मात्र, वगार सोडता न आल्याने मृत्यू झाला. तसेच अन्नधान्य, कपडे, शेतीपयोगी साहित्यासह दीड ते पावणदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेचा अद्यापही पंचनामा झालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी खंदारे यांनी केली आहे.