हिंगोली - जिल्हासामान्य रूग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर येथे रुग्णांना धड खाटाही उपलब्ध होत नाहीत. यामुळे या रुग्णांवर चक्क जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे. धक्कादायक गोष्ट ही, की यांच्यावर डॉक्टर नाही, तर येथील सफाई कमगार उपचार करत आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. अनेकदा तर ओषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना अर्धवट उपचार घेऊनच परतावे लागते. याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे अपघात ग्रस्त रुग्णांनासुद्धा खाटा उपलब्ध नसल्यामुळे जमिनीवर उपचार घ्यावे लागत आहे.
या सर्व गोष्टींकडे रुग्णालय प्रशासन जाणीवपूर्वक काना डोळा करत आहे. सहा महिन्यांपूर्वीच रूजू झालेले शल्यचिकित्सक डॉक्टरांच्या दांड्या थांबवू शकले नाहीत, रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषधे पुरवू शकले नाहीत, मात्र त्यांच्या या हलगर्जीपणाचा फायदा येथील लिपिक घेत असून त्यांच्या त्रासाला कंटाळून कित्येक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र त्यावर अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.
वाशिम जिल्ह्यातील एक वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला होता, त्याना उपचारासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल केले होते, तर येथील व्यवस्था पाहून वऱ्हाडी मंडळी पुर्णतः चक्राहून गेली होती. त्यानी स्वतःहून डिस्चार्ज घेत वाशिम रुग्णालयात जाणे पसंत केले होते. जिल्ह्यात एकूण 12 रुग्णवाहिका आहेत तरी रुग्णालयात उभ्या केलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. यावर कुणाचा अंकुशच नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
रुग्णालयात कार्यरत असलेल्या बहुतांश डॉक्टरांचे स्वतः चे रुग्णालय आहे. त्यामुळे ते बऱ्याचदा रुग्णालयाच्या हजेरीवर केवळ स्वाक्षरी करून दांडी मारतात. त्यामुळे रुग्णालयातून रेफरचे प्रमाण सर्वाधिक जास्त वाढले आहे. एवढा अनागोंदी कारभार असतानादेखील प्रशासन त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. तसेच मुख्य आलेल्या रक्तपेढीतीलही कर्मचारी इतर विभागात हलविण्यात आल्याने, तीन कर्मचाऱ्यांवर रक्तपेढी विभागाची मदार आहे. रुग्णालयाची, अशी अवस्था असतानाच शल्यचिकित्सक बदलीच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजले. रूग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले आहेत.