हिंगोली - संपूर्ण राज्यात सध्या कोरोना विषाणूचे थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून अतोनात प्रयत्न केले जात आहे. विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच सोशल डिस्टंसचेही आवाहन करण्यात येत आहे. असे असताना हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे बँक ग्राहकांनी सुरक्षित अंतर राखण्यासाठी मारलेल्या गोल रिंगणात स्वतः उभे न राहता बूट, थैली, दुधाची कॅन ठेऊन एकत्र बसून गप्पांमध्ये रंगल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नागरिकांना सोशल डिस्टंसचे गाभीर्य अजूनही लक्षात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शासन स्तरावर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यासाठी जो मदतीचा ओघ सुरू झाला आहे, तो लाभ मिळवण्यासाठी सोशल डिस्टंस पाळले जात नाही. विशेष करून सर्वच लाभ हे बँकेमध्ये दिले जात असल्याने, या ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षित अंतरावर जागा आखून दिली आहे. मात्र, आखाडा बाळापूर येथील मध्यवर्ती बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी बँकेने आखून दिलेल्या जागेत बँक ग्राहकांने डोके चालवत ही जागा बूट तर कोणी थैली, दुधाची कॅन ठेऊन आरक्षित केली. तसेच बँकेच्या ओट्यावर एकत्र बसून गप्पा रंगत सोशल डिस्टंसचा फज्जा उडविला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसशिवाय पर्याय नाही, असे वारंवार सांगुनही नागरिकांवर मात्र, त्याचा काही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.