हिंगोली- मुंबई येथे रॅपिड अॅक्शन फोर्स मध्ये कार्यरत असलेल्या वसमत तालुक्यातील कुपटी येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा दिवदमन येथे शनिवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला. बालाजी किसन धुळे असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. हृदयविकारने मृत्यू झालेल्या बालाजी धुळे यांनी शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या सेवानिवृत्त मित्राला गुडनाईट असा संदेश पाठवला होता. मात्र, तो त्यांचा शेवटचा संदेश ठरला. धुळे यांच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर कुपटी या मूळ गावी सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बालाजी धुळे हे नवी मुंबई येथील रॅपिड अॅक्शन फोर्स बटालियन-102 मध्ये सहायक पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी ते दिवदमन येथे पथकासह बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. नेहमी प्रमाणे त्यांनी घरच्यांशी संपर्क साधला. त्यानंतर शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात येत होते. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या अकस्मात मृत्यूच्या घटनेची माहिती बटालियनकडून वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ही बातमी धुळे यांच्या नातेवाईकांना कळवली आहे.
धुळे यांच्या या अकस्मात निधनाच्या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव आज रुग्णवाहिनेने कुपटी येथे आणले जाणार आहे. आजच(सोमवारी) त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उत्कृष्ट कुस्तीपट्टू म्हणून होती त्यांची ओळख
धुळे यांना मुळात अगदी लहान पणापासूनच नोकरीचे आकर्षण होते. शिवाय उत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. कुपटी येथे बारावी पर्यंत शिक्षण झाले, नंतर 1991 मध्ये नांदेड येथील केंद्रीय राखीव दलात दाखल झाले. तेथे त्यांनी कमांडोचे प्रशिक्षण पूर्ण केले. नंतर मुंबई येथे 102 रॅपिड अॅक्शन फोर्समध्ये त्यांना नियुक्ती मिळाली.
सेवानिवृत्त मित्राला केला होता गुड नाईटचा संदेश-
उत्तम लेकुळे हे दोन महिन्यापूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते. ते धुळे यांच्या संपर्कात होते. धुळे यांनी शनिवारी मित्र लेकुळे यांना गुडनाईटचा संदेश पाठविला होता. जेव्हा धुळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली त्यावेळी त्यांना धक्काच बसला. धुळे यांचा तो गुड नाईटचा संदेश शेवटचा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.