हिंगोली : हिंगोली प्रशासनास आज(गुरुवार) प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या-ज्या भागात नव्याने रुग्ण आढळलेत तो भाग प्रशासनाच्या वतीने सील केला जात आहे.
हिंगोली शहरात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये नवा मोंढा भागातील पोस्ट ऑफिस रोड जवळील 77 वर्षीय व्यक्ती असून, या रुग्णाला सारीचा आजार असल्याने, जिल्हा सामान्य रुग्णलायत दाखल केले होते. मात्र, त्याचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांचा बाहेर गावावरून येण्याचा कोणताही इतिहास नाही. तर दुसरा रुग्ण हा 65 वर्षीय असून शहरातीलच कासारवाडा भागातील रहिवासी आहे. त्यालादेखील सारीचा आजार झालेला होता, त्याचाही काहीच इतिहास नाही. आज कॉलनी भागात आढळळेल्या रुग्णाचा देखील बाहेर गावावरून आल्याचा कोणताही पूर्व इतिहास नसून त्यालादेखील सारीचाच आजार झाल्याने सामान्य रुग्णलायत दाखल केले होते. याच बरोबर वसमत येथील ब्राह्मण गल्ली, गुलशन नगर, जुमा पेठ, या भागात आढळलेले रुग्ण सारीच्या आजारामुळे रुग्णलायत दाखल झालेले होते. यांचा देखील कोणताही ही इतिहास नाही. त्यामुळे प्रशासन चांगलेच गोंधळून गेले आहे. तर वसमत येथील सम्राट कॉलनी भागात नव्याने आढळेला रुग हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आला होता. वसमत अन् हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे आढळेला रुग्ण हा अगोदरच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील आहे.
एकंदरीतच आता हिंगोली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा हा 373 वर पोहोचला असून, यातील 292 रुग्णही बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, आज घडीला जिल्ह्यातील विविध पूर्णवाढ तसेच करुन केअर सेंटरमध्ये 81 रुग्णावर उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या 11 रुग्णांमुळे हिंगोली जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडालेली आहे. आता हे रुग्ण किती जणांच्या संपर्कात आले असावेत त्यांच्यामध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.