हिंगोली - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज(रविवार) हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात आठ कोरोनाबाधित नव्याने रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे द्विशतक पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, 163 रुग्णही बरे झाले असून आजघडीला 37 रुग्णांवर विविध कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. विशेष म्हणजे कोरोना आता शहरी ठिकाणावरून ग्रामीण भागात पोहोचला आहे. आज औंढा नागनाथ येथील एक आणि सेनगाव क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे, पाऊस तोंडावर असून पेरणीच्या तयारीत असलेले शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत.
त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात एकूण 200 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यातील 163 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 37 रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरू आहेत. वसमत येथील कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण चौदा रुग्ण उपचार घेत आहेत. तर, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये एकूण 22 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 2 हजार 484 व्यक्तींना विविध आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 138 व्यक्तींचे अहवाल हे आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. तर, 2 हजार 190 व्यक्तींना या अहवालानुसार डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 275 व्यक्ती कोरोना संभाव्य म्हणून भरती आहेत. त्यापैकी 97 जणांचे अहवाल हे प्रयोगशाळेकडे प्रलंबित असल्याची माहिती हिंगोली प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.