हिंगोली - महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, या नावाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. वास्तविक हा निर्णय महाविकास आघाडीचा. मात्र, याचे श्रेय फक्त शिवसेनाच घेत असल्याची चर्चा हिंगोलीत होत आहे. याचे कारण म्हणजे शहरात जागोजागी लावलेले बॅनर. उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी शहरात सर्वत्र बॅनर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर काँग्रेस अथवा राष्ट्रवादी पक्षाचे नाव अथवा नेत्यांचे फोटो देखील नाही. त्यामुळे सध्या या फलकांची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा... दिल्ली विधानसभा: काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीच्या अध्यक्षपदी राजीव सातव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत विनाअट कर्जमाफीची घोषणा केली. त्याबाबत अभिनंदन करण्यसाठी हिंगोली शहरात शिवसेनेचे फलक झळकत आहेत. मात्र, राज्यात आघाडीचे सरकार असतानाही बॅनरवर शिवसेनेचेच नेते आणि त्यांचेच नाव झळकत असल्याने शिवसेना कर्जमुक्तीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मात्र, हे फलक स्थानिक ठिकाणावरून लावलेले आहेत. त्यात सरकारच्या बाबतीत असलेले प्रेम व्यक्त केले आहे. त्यात काही गैर नाही, असे म्हटले आहे.
हेही वाचा... 'दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार?'
काँग्रेस नेत्यांनी मात्र यावर आपली वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिकांना योग्य वाटले म्हणून त्यांनी फलक लावले, यावर आम्ही काही बोलणार नाही. पक्षाचे आदेश असते, तर त्या फलकावर महाविकास आघाडीचे नाव असते. मात्र, कदाचित हे फलक स्थानिक ठिकाणांवरून लावण्यात आले असावेत. म्हणून त्यांनी नाव टाकले नसतील, असे काँग्रेस नेते आणि शिक्षण व अर्थ सभापती भय्यासाहेब देशमुख यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले. मात्र तरिही शहरात हे फलक नेमके कोणी लावलेत? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा... 'आता तरी मंत्रीमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी