हिंगोली - जिल्ह्यातील तळणी परिसरात वानराने ट्रॅक्टर चालकावर झेप घेतली आणि त्याला मारायला सुरुवात केली. त्यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटून ट्रॅक्टर उलटले. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गजानन भालेराव असे जखमी चालकाचे नाव आहे. भालेराव गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तळणी परिसरातून ट्रॅक्टर घेऊन घराकडे निघाले होते. ते मोहाडी शिवारात पोहोचताच त्यांच्यावर वानराने हल्ला केला. भालेराव यांनी आरडाओरड केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी वानराला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वानराने न घाबरता त्यांना जखमी केली. त्यामुळे त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर उलटले. त्यामुळे भालेराव झाडावर फेकले गेले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेडला पाठवण्यात आले.
वानराच्या दहशतीमुळे तळणी परिसरातील पेरण्या खोळंबल्या -
पावसामुळे तळणी परिसरात खरिपाच्या परेणीला गती आली आहे. पेरणी लवकर करण्यासाठी ट्रॅक्टरचा आधार घेतला जात आहे. मात्र, वानरे फक्त ट्रॅक्टर चालकावरच हल्ला करीत असल्याने एकही ट्रॅक्टर चालक या परिसरात ट्रॅक्टर नेण्याची हिम्मत करीत नाही. त्यामुळे या भागातील पेरण्या खोळंबल्या आहे. शेतकरी या वानराला ताब्यात घेण्याची प्रतिक्षा करीत आहेत.
विशेष म्हणजे हे वानर इतरांना काही करत नाही. फक्त ट्रॅक्टर चालकांवरच हल्ला करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गेल्या दोन ते तीन महिन्यात ४ ते ५ ट्रॅक्टर चालकांवर वानराने हल्ला चढवला आहे. ट्रॅक्टरमुळे वानराचा अपघात झाला असावा. त्यामुळे वानराकडून ट्रॅक्टरवर हल्ले होत असल्याचे वनाधिकारी केशव बावळे म्हणाले. तसेच या वानराला उद्या ताब्यात घेणार असल्याचेही ते म्हणाले.