हिंगोली - येथील गड्डी पीर गल्लीत असलेला श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती 'मोदकाचा गणपती' म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. या मोदकाच्या गणपतीच्या दर्शनासाठी परराज्यातून भाविक आवर्जून हजेरी लावतात. विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळामध्ये तरी या ठिकाणी भाविक मुक्कामी राहून दर्शनासाठी पहाटे चारच्या सुमारास रांगा लावतात. मात्र, कोरोना महामारीमुळे यंदाही हा गणेशोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकातून नाराजीचा सूर उमटत आहे. कोरोना काळ असला तरीही येथील श्री विघ्नहर्ता गणपतीची पूजाअर्चा ही नियमित सुरूच राहते. यामध्ये शहराजवळच असलेल्या कयाधु नदीतूंन कावडद्वारे पाणी आणून अभिषेक केला जात आहे. नंतर पूजा अर्जा व देवाला नैवेद्य दाखवल्या जात आहे. गेल्या अनेक ही परंपरा सुरू आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला.
हिंगोली शहरातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा सर्वदूर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात तर या ठिकाणी या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी एकट्या हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक आवर्जून हजेरी लावतात. येथील मोदकाचं विशेष महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षापासून मोदक वाटपाची प्रक्रिया याठिकाणी घेतली जाते. ही परंपरा कोरोना महामारीमुळे दोन वर्षापासून ठप्प पडली आहे.
नेमकी काय आहे मोदकाची परंपरा -
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा नवसाला पावणारा गणपती असून येथील मोदकाला फार महत्त्व आहे. नवस बोलून घेतल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपापल्या परीने मोदक वाटप केले जातात. यामध्ये एखादा भाविक 11 ते असंख्य मोदक वाटप करू शकतो. हा मोदक घेतल्यानंतर त्याची मोठ्या मनोभावाने घरामध्ये ठेवून पूजाअर्चा केली जाते. यानंतर आपल्या मनात असलेली इच्छा पूर्ण झाल्यानंतर मोदक याठिकाणी येऊन वाटप केले जातात. त्यामुळे शक्यतोवर गणेशोत्सव काळामध्ये हा मोदक उत्सव कोणताही भाविक टाळत नाही. मात्र, जगभरात सुरू असलेल्या या कोरोना महामारी या मोदक पुस्तकावर संकट कोसळले आहे.
हेही वाचा - Gauri Festival : गौरींचे उत्साहात आगमन; 'अशी' आहे कोकणातील गौरी आगमनाची परंपरा
संस्थानचे अध्यक्ष काय म्हणाले?
गणेशोत्सव काळात नियमित श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची पूजा अर्चा केली जात आहे. भाविकांची दरवर्षी याठिकाणी मांदियाळी दिसून येत होती. मात्र,कोरोना महामारीमुळे मंदिराची दारे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मोदक नेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. मात्र, कोरोनामुळे हा मोदक उत्सवही रद्द करण्यात आला आहे. भाविकांचा हिरमोड झाला आहे. याची आम्हालाही जाण आहे. मात्र, 'जिएंगे तो और लढेंगे', श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची आपल्यावर कृपा असेल तर निश्चितच आपल्याला हा मोदकोत्सव पुढच्या वर्षी साजरा करून मोदक मिळतील, अशी प्रतिक्रिया संस्थानचे अध्यक्ष रमाकांत मिस्कीन यांनी दिली.
बाकी सर्व सुरु फक्त मंदिर अन शाळाच बंद का?
कोरोना महामारीमुळे संपुर्ण जगावर संकट कोसळले आहे. अशातच अनेक व्यवसायिक व सर्वसामान्य देखील हैराण झाले आहेत. एवढी भयंकर परिस्थिती असतानाही सर्व काही सुरू आहे. मात्र, शाळेची, मंदिराचीच दारे का बंद केली असावी? असा प्रश्न भाविकातून व्यक्त केला जात आहे.